वादळवा-यात, उनपावसात
प्रयत्नांनी विणलेले
ते प्रेमाचे धागे तोडताना
किती अश्रू सांडले,
माझं मलाच माहीत.
पण भावनांच्या भोव-यात अडकलेले
ते दिवस मी कसे पार केले,
ते खरंच माझं मलाच कळलं नाही.
आज कळतय्.
माणसं जातात सोडून,
पण प्रेम मात्र रहातं.
हाडं गारठवणा-या थंडीत
ऊब देणा-या एखाद्याच निखा-यासारखं,
मनाच्या एका कोप-यात,
बकुळीच्या फुलासारखं,
एखाद्या अदृश्य शक्तीसारखं,
एखाद्या अक्षय स्रोतासारखं,
आपल्या पाठीशी उभं असतं ते,
आणि उभारी देत रहातं
खचत चाललेल्या मनाला.
प्रेम कोणावर केलं, कधी केलं,
सफल झालं की निष्फळ झालं
याला फारसा अर्थ नाही.
प्रेम करता येणं महत्त्वाचं.
आणि त्याची ताकद अनुभवणंही
तितकंच महत्त्वाचं.
(composed around 1995-96)
No comments:
Post a Comment