Monday, 7 January 2019


सुकी भेळ
तुम्हाला सुकी भेळ हवीय? असं चिरक्या आवाजात मला विचारत भेळवाल्यानं मी एके47 मागितल्यासारखा चेहरा केला. त्याला आणि आजूबाजूच्या उगाच हसणा-या चोंबड्या खादाडांना मनातल्या मनात एक शिवी देऊन मी माझी भेळ हस्तगत केली. कधी एकदा घरी पोचून ती खात्ये असं झालं होतं
एखादी मोकळीशी जागा पाहून गाडी थांबावी. मंडळी उतरून पाय मोकळे करेस्तोवर 2-3 जणांनी त्यातल्या त्यात सपाट जागा बघून तिथे 4 मोठे पेपर अंथरावेत. “अजून एक असू देम्हणेपर्यंत तीनेक पिशव्या चुरमुरे अन् एकच पिशवी फरसाण बाहेर येतं. एका बाजूला सुरीने अशा जागी जमेल तितका बारीक चिरलेल्या कांद्याचा छोटा ढीग लागलेला असतो.  कुणाकुणाला आवडतात म्हणून एखादीने घरूनच चिरून आणलेले टोमॅटो बाहेर येतात.  छोट्या डबीतला झणझणीत हिरव्या मिरच्यांचा ठेचाही वर्णी लावतो.  दोन अनुभवी जण किंवा जणी पेपरवरच या सर्व वस्तू ओतून - हाताने काढलेले चालत नाही, ते भस्कन् ओतावेच  लागते - हलक्या हाताने त्या मिक्स करतातमला हे नको, ते नको म्हणणा-यांचे तिथेच वेगळे ढीग केले जातात. (शेवटी सगळे एकत्रच होतात पण तोपर्यंत कोणाला ते लक्षात येण्यापलिकडे आनंदावस्था आलेली असते.) पांढरेशुभ्र चुरमुरे, पिवळे फरसाण, हलक्या केशरी रंगाची बुंदी, गुलाबी कांदा, लालभडक टोमॅटो अशी मैफल जमते. बारीक चिरलेली कोथिंबीर या रंगसंगतीवर चार चांद लावते. सगळं काही नीट मिक्स झालं की या सगळ्याचा एकत्रित सुगंध आसमंतात दवंडी पिटतोभेळ तयार आहे रे!
त्या पेपरभोवती दाटी करून सगळेजण मावतात. एखाद्या गुडघा पेशंटला हा वानवळा कागदात पास केला जातो. आणि मग फक्क्या मारून प्रत्येकजण भेळेवर ताव मारण्यात गुंग होतो. “तो ठेचा दे रे इकडे” “मला नको टोमॅटो” “अजून फरसाण नाही मिळणारचव जाते भेळीची सगळी” “दाणे कमी पडले का? मी आणलेत हं अजूनया प्रकारचे डायलॉग सुरू होतात. जोडीला कुठलंहीअगदी क दर्जाचंसुद्धा... गाॅसिप असलं की मग तर बहारच!
या सगळ्यामध्ये एखाद्या पन्नाशी जवळ आलेल्या बाबाला आपल्या टीनएजर मुलांची शाळा घ्यायची हुक्की येते. “अरे तुम्हाला काय कळणार याची मजातुम्ही त्या पिझा आणि मँकडीला वा वा करणार इ. .” आता हा माणूस जर त्याच्या मुलाला बोलत असेल तर तो कुमारवयीन प्राणी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करतो आणि भेळेवर लक्ष केंद्रित करतो. पण जर तो मुलीला बोलत असेल तर तिला जरा बापाची कणव असते, त्यामुळे तीअसं काही नाही हो बाबा, आम्ही खातो की नेहमी इ इबोलायचा प्रयत्न करत असते.मात्र बापाला भेळ आणि संस्कृती दोन्ही चढलेले असल्यामुळे ती अगदी केविलवाणी होते. अशा वेळी तिचा एखादा कझिन तिला हळूचलक्ष देऊ नको गं काकांकडेआता स्विगीवर पण मिळते सुकी भेळ, हे बघअसं म्हणून तिला त्यातून बाहेर काढतो.  एका बाजूला, मुले किंचाळेपर्यंत किंवा त्यांचे पिताश्री आपल्या नावाने शंख करेपर्यंत त्या दोघांकडे दुर्लक्ष करणे या प्रवासी न्यायानुसार सर्व आई मंडळी भेळेचे तोबरे भरत असतात.
खालचा कागद फाटायच्या आत ती भेळ संपवणे हा एक सरावाचा भाग असतो. शेवटचा मसालासुद्धा ओल्या बोटाने टिपून जिभेवर सरकवायला मात्र अस्सल खवय्याच हवा!
यानंतर एखाद्या जाणकार स्त्रीने हळूच आपल्या बँगेतून एक मोठा थर्मास काढला की घोटभर चहाच्या कल्पनेने खाणा-यांची अवस्था काय करू काय नको अशी होतेपण नसला चहा तरी तुडुंब भरलेल्या पोटानेए टपरी दिसेल तिथे थांबर रेअसं म्हणत गाडी मार्गस्थ होते.
एकंदरीत काय, ही सुकी भेळ म्हणजे आपल्या प्रवासाचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. अर्थात दरवेळी आपल्यासोबत आपले सर्व सुह्रुद असतीलच असं नाही, पण त्यांची आठवण काढत घरीसुद्धा खाल्लेली सुकी भेळ प्रत्येक वेळी त्याच चवीची अनुभूती तर देईलच, पण तो सगळा प्रसंग आठवत आठवत खाल्लेली भेळ अजूनच फर्मास लागेल हे नक्की! शेवटी आपले नातेवाईक म्हणजे भेळच तर असते, नाही का?
कधी खाताय मग सुकी भेळ?

8 comments:

  1. Kadhi bhetuya Bhel khayala?

    ReplyDelete
  2. खतरनाक लिहीलंय...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! तुम्ही खरे लेखक, आम्ही आपले उगाचंच...

      Delete
  3. खुपच छान आठवणी जाग्या झाल्या

    ReplyDelete
  4. Khup ch chhan.....kuthetary long drive karun aalya sarakhe watale...aani madhech thambun bhele cha aaswad ghetlya cha manasvi aanand..(lahan pana pasun mothe hoyi paryant anubhavalela)zala.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! अशा प्रतिसादामुळे काहीतरी लिहीत रहावं अशी इच्छा वारंवार होते...

      Delete